दि. : २९/०७/२०१७

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि दि.२९/०७/२०१७: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून यापुढे आता आयटीआयच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सध्या याबाबतची तयारी सुरु असून जानेवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, कौशल्य विकास आणि उदयोजकता विभागाचे सचिव असिम गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त ई. रवींद्रन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त ॲप्रेन्टीसशिप मिळवून देण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ॲप्रेटिस ॲक्टमधील सुधारणेमुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रमात धोरणात्मक सुधारणेअंतर्गत राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. कौशल्य विकास संस्थाचे नोंदणीकरण, १५ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळादवारे आर्थिकदृष्टया मागास घटकांना मदत, तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी द्वीलक्षी अभ्यासक्रमाच्या व्याप्तीत वाढ अशा विविध विषयात कौशल्य विकास विभागाने आघाडी घेतली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील आयटीआय आधुनिकीकरणाचे केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कौतूक

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातील शासकीय आयटीआयचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आधुनिकीकरण होत असून ही निश्चित कौतुकाची बाब असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुढी यांनी यावेळी सांगितले. राज्यातील कौशल्य विकास विभागाचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन आयटीआयच्या गुणवत्तेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात कौशल्य विकास विभागाने स्वयं वर्गवारीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून लघु सत्र कौशल्य प्रशिक्षणही जिल्ह्यांमध्ये देण्यात यावे यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागामार्फत २०२२ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ४.५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून दरवर्षी ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, असे कौशल्य विकास व उद्योजकता, मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य विकास विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने केलेली प्रगती आणि भविष्यातील नियोजन याबाबतचे सादरीकरण केले. याबरोबरच कौशल्य विकास विभागामार्फत परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्लेसमेंट केंद्र स्थापन करणे, आगामी काळात महिला उद्योजिका वाढविण्यासाठी काय करता येईल याबाबतही या बैठकीदरम्यान सादरीकरण करण्यात आले.

महास्वयंम पोर्टल वरील कौशल्य कालदर्शिक अनावरण

कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेबपोर्टलचे एकत्रिकरण करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले असून या वेबपोर्टल वर नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेले कौशल्य कालदर्शिक चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुढी यांच्या हस्ते आज करण्यात आले. महास्वयंम पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे.
Mahaswayamrojgar